दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर मुंबईचा राजा गणेशगल्ली मंडळाची विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे. गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक विसर्जनस्थळी येत असतात.
याच पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गर्दी होत असल्याने रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य, पश्चिम रेल्वेकडून अतिरिक्त फेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्रभर विशिष्ट वेळाने लोकल धावणार असून विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 4 लोकल चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.